नवी दिल्ली । आशियाई कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या तिन्ही भार्तीइ महिला मल्लांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि दिव्या ककरानला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साक्षीला 60 किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आंतरराष्ट्रीय कुस्ती वर्तुळात पुनरागमन करणारी साक्षी फॉर्मात नसल्याचे चित्र दिसले. साक्षीला रिओ ऑलिम्पिकमध्ये 63 किलो वजन गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या रिसाकीविरुद्ध 2 मिनिट 44 सेकंदामध्ये 10-0 ने पराभव स्वीकारावा लागला.
भारताची अन्य महिला मल्ल विनेश फोगाट हिलाही महिलांच्या 55 किलो वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिव्या ककरान महिलांच्या 69 किलो वजन गटात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. विनेशची वाटचाल सुरळीत राहिली. महिलांच्या 55 किलो वजन गटात तिने उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या सेवारा इशमुरातोव्हाचा 10-0 ने तर त्यानंतर चीनच्या झांगचा 4-0 ने पराभव केला. दिव्याने अंतिम फेरी गाठताना प्रभावित केले. तिने ताइपेच्या चेन चीविरुद्ध 2-0 ने तर उपांत्य फेरीत कोरियाच्या हियोनयोंग पार्कचा 12-4 ने पराभव केला. रितू फोगाटला महिलांच्या 48 किलो वजन गटात उपांत्य फेरीत जपानच्या युई सुसाकीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पिंकीला महिलांच्या 53 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.