साक्ष देण्यासाठी दोघांवर जीवघेणा हल्ला

0

भोसरी : एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष द्यावी यासाठी दोघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी चक्रपाणी वसाहत येथे घडली. ज्योतम विनायक फरताळे (वय 25) व अविनाश विलास कांबळे (दोघे.रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी लक्ष्मण उर्फ बंड्या गोरवे, अनिकेत माने, राम गोरवे, शुभम उर्फ दाद्या माने, अनिल जाधव, विक्की गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरताळे याचा मित्र गणेश वाघमारेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी महेश डोंगरे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष द्यावी यासाठी विक्की गुप्ता याने फरताळे याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान रविवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी टोळके चक्रपाणी वसाहत येथील शास्त्री चौकात आले. तेथे थांबलेल्या फरताळे व कांबळे यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. दोघांवर वार करून पोबारा केला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही जणांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील गाडे पुढील तपास करीत आहेत.