जळगाव– काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. दोन महिन्यांनी लग्नाची तयारी उत्सकुता असतांना तरुणाने शहरातील बरजंग बोगद्याजवळ रेल्वे रुळावर रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आहे. अविनाश शैलेंद्र सोनवणे (वय-23 रा. पिंप्राहा हुडको) असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान या तरुणाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली होती, ती पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नातेवाईकांडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा हुडको येथे अविनाश शैलेंद्र सोनवणे हा आपल्या दोन मोठे भाऊ आणि आई या परिवारासह वास्तव्यास आहे. पिंप्राळा स्टॉपवर चायनीजची गाडी लावून तसेच लग्नसमारंभांमध्ये केटर्सचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गुरुवारी दुपारी दुकानसाठी लागणारा किराणा घेवून तो घरी आला. किराणा घरात ठेवल्यानंतर अविनाश कामानिमित्ताने दुचाकी घेवून बाहेर गेला होता. यानंतर त्याच्या कुटुंबियांना दुपारी 2 वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ रेल्वे खंबा क्रमांक 418/3-1 अप लाईनवर अविनाशने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
दुचाकीवरुन पटली ओळख
घटनेची माहिती उप-स्टेशन प्रबंधक आर. के. पालरेचा यांनी लोहमार्ग पोलिसांना दिल्यानंतर लोहमार्ग पोलीस सचिनकुमार भावसार, किशोर पाटील, अनिल नगराळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळावर आढळून आलेल्या दुचाकी वरुन पोलिसांनी ओळख पटविली. यात मयत तरुण हा अविनाश सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी अविनाशच्या कुटुंबियांसह मित्रांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अविनाशने कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले हे कळू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूचे नोंद करण्याचे काम सुरु आहे.