पुणे । पाकिस्तानकडून साखर आयात करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला नसला तरी पाकिस्तानने 15 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तानला भारत हा जवळचा देश असल्याने अन्य मार्गाने ती साखर भारतात आल्यास त्याचे परिणाम येथील कारखान्यांवर होऊ शकतात. त्यामुळे पाकिस्तानची साखर भारतात येणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी मांडले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन साखर संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासांलक शिवाजीराव देशमुख, कार्यकारी संचालक संजय खताळ आदी उपस्थित होते.
सरकारने आयात शुल्क 70 टक्के करावे
वळसे-पाटील म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत देशपातळीवर उसाची लावणी जास्त असून उत्पादन ही जास्त होणार आहे. मात्र झालेले ऊस उत्पादन गरजे इतके असेल त्यामुळे साखरेचा जास्त साठा राहणार नाही. साखर उद्योगामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा अजूनही जास्त हस्तक्षेप होत आहे. तसेच भारत सरकार आयात-निर्यात धोरण ठरवते. त्यामुळे या धोरणात सरकारचे सातत्य राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सरकारने आयात शुल्क 50 टक्के आहे; ते 70 टक्के करावे. तसेच पडणारे साखरेचे भाव रोखण्यासाठी सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा. या संदर्भात 7 डिसेंबरला आम्ही प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे.
साखरेवर 5 तर मळीवर 18 टक्के जीएसटी
तसेच पुढच्या वर्षी साखरेचे उत्पादन वाढेेल गेली तीन-चार वर्षे दुष्काळ होता यावर्षी पाऊस चांगला झाला असून उसाची लागवड वाढली आहे. यामुळे उत्पादन ही वाढेल, असे पवळसे पाटील म्हणाले. साखरेचे भाव पडल्याने राज्य सहकारी बँकेने उसाची किंमत देण्यासाठी 2 हजार 30 रुपये तर एफआरपीसाठी 2 हजार 500 रुपये दिले आहेत. परिणामी अडचणी वाढल्या आहेत. सध्या साखरेवर 5 टक्के तर मळी व इथेनॉलवर 18 टक्के एवढा जीएसटी लावला आहे. साखर कारखानदारी हा शेतकर्यांचा व्यवसाय आहे. यात ऊस उत्पादक, तोडणी मजर तसेच कारखान्यात काम करणारे मजूर हे साखर उद्योगावर अवलंबून आहेत. त्यामुळे साखर उद्योग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत आम्ही देखील त्या दृष्टीने प्रयत्न करत असून आमच्या प्रयत्नाला यश येत आहे असे वळसे-पाटील म्हणाले.
ठिबक सिंचन करणे अनिवार्य
उसासाठी राज्य सरकारने ठिबक सिंचन करणे अनिवार्य केले तरी ज्या क्षेत्रात पाणी मुबलक प्रमाणात आहे. तेथील शेतकरी वर्गाची मानसिकता ठिबक सिंचनाकडे वळणारी नाही. त्यामुळे इन्स्टिट्युट, राज्य सरकार शेतकर्यांची मानसिकता तयार करण्याचे प्रयत्न करणार आहे, असे वळसे-पाटील म्हणाले
यावर्षीचे साखरेचे अंदाजे उत्पादन (आज आखेर)
राज्य साखर उत्पादन
उत्तर प्रदेश 27.28 लाख टन
महाराष्ट्र 31.3 लाख टन
कर्नाटक 13.50 लाख टन
गुजरात 2.95 लाख टन
तामिळनाडू 0.95 लाख टन
इतर राज्ये 3.95 लाख टन