ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाकित
उसाला एफआरपीनुसार दर देणे शक्य होणार नाही
पुणे : जागतिक बाजारपेठ मंदावल्याने तसेच प्रचंड प्रमाणात उस उत्पादन झाल्याने पुढीलवर्षी साखर उद्योगावर खूप मोठे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ठरवून दिलेला दर ही कारखाने शेतकर्यांना देऊ शकणार नाहीत, असे भाकित राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार
बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणार्या अप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचे वितरण शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते झाले. यावेळी शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे असल्याचे भाकित वर्तवले. पवार म्हणाले, पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना केंद्र सरकाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे पैसेदेखील कारखाने देऊ शकणार नाहीत.
अर्थव्यवस्था मजबूत करण्याची गरज
जगातील साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्याने जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. याचा परिणाम भारतातील साखर उद्योगावर होतो. भारत पूर्वी साखर आयात करणारा देश होता पण आता त्याची निर्यातक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.