756.90 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता वेगात सुरू असून सध्या तब्बल 193 साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत 756.90 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा परतीच्या मान्सून बरसला नसल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उसतोडणीसाठी शेतकर्यांची घाई सुरू आहे. त्यामुळेच राज्यात सगळेच कारखाने आता वेगात सुरू आहे.
यंदा जास्त उत्पादन
गेल्या वर्षीपेक्षा आतापर्यंत जास्त साखरचे उत्पादन झाल्याचे आकडेवारीवरुन दिसत असले, तरी गेल्यावर्षी गळीत हंगाम हा जूनपर्यंत सुरू होता, कारण राज्यात पाऊस चांगला बरसला होता. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. मराठवाड्यात तर आतापासूनच पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. ती आगामी काळात आणखी वाढणार आहे.
पुणे विभागात सर्वाधिक 62 कारखाने सुरू
राज्यात सध्या 101-सहकारी, तर 92 हे खासगी कारखाने सुरू आहेत. सर्वाधिक 62 कारखाने हे पुणे विभागात सुरू आहेत. यात 31 खासगी आणि तितक्याच सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूर-38, नांदेड-35, नगर-28, औरंगाबाद-24 कारखाने सुरू आहेत. अमरावती विभागात सर्वांत कमी म्हणजे फक्त दोन कारखाने सुरू आहेत.
राज्यात सध्या सुरू असणार्या 193 कारखान्यांमध्ये आतापर्यंत 695.59 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून सुमारे 756.90 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात राज्यात 184 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होता. त्यातून 668.95 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.