साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर बैठक घेणार

0

पुणे : गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे उसाचे उपन्न चांगले आले आहे. त्यामुळे कोणताही साखर कारखाना बंद पडू नये, अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी येत्या आठवड्याभरात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, अखिल भारतीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, शिवाजीराव नागवडे, सतेज पाटील, शंकरराव कोल्हे, कल्लपा पाटील, साखर आयुक्त बिपीन शर्मा आदी उपस्थित होते.

आमचे सरकार सहकाराच्या पाठीशी उभे राहील का, अशी अनेकांना शंका होती. मात्र, दुष्काळात आम्ही शेतकर्‍यांना विविध अनुदाने दिली. एफआरपीचा आग्रह धरतानाच साखर कारखान्यांनाही मदत केली. साखर उत्पादनात उत्तर प्रदेश पुढे असला, तरी तेथे 60 टक्के रक्कम एफआरपी म्हणून दिली जाते. महाराष्ट्रात मात्र 98 टक्के रक्कम दिली जाते, असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.

व्यवस्थापनावर संशोधन व्हावे
साखर कारखान्यांचे इथेनॉल तेलकंपन्या घेत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे यातून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर तयार झाल्यावर त्याचे व्यवस्थापन करण्यावर संशोधन व्हायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली.

वीजखरेदी दरावर तोडगा काढू
साखर कारखाने निर्माण करत असलेल्या विजेला पुरेसा भाव नसल्याने कारखाने अडचणीत आहेत. वीज निर्मितीसाठी घेतलेल्या तंत्रज्ञानामुळे कर्जाचे हप्ते भरताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. या विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांची ’पारदर्शक’ कोटी
सहकार क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर व्यासपीठावर होते. यातील बहुतांश राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे सुरुवातीला अनेकांची नावे मुख्यमंत्र्यांनी घेतली. अखेर नावांची लांबलचक यादी वाचून झाल्यावर, हा मंच वजनदार आहे, कोणाचेही नाव घ्यायचे राहिले तरी माझ्यासाठी अडचणीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच मंडपात खसखस पिकली. साखर उद्योगासाठी पारदर्शी व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि यासाठी बृहत विचार करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पारदर्शी शब्द उच्चारताक्षणी तांत्रिक अडचणीमुळे ध्वनिक्षेपकातून आवाज फाटला. बघा शब्द उच्चारल्यावर काय होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या कोटीवर मंडपात हशा उसळला. मात्र, व्यासपीठावरील मान्यवरांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.