साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेचा ‘तारण’ आधार!

0

पुणे : वर्ष 2017-2018च्या गाळप हंगामासाठी राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने तब्बल 3500 कोटींचे तारणकर्ज मंजूर केले आहे. या कर्जातून एफआरपीची रक्कम कारखान्यांना अदा करता येईल. उत्पादीत झालेली साखर बँकेकडे तारण राहणार असून, तिची विक्री केल्यानंतर हे कर्ज फेडावे लागणार असल्याची माहिती शिखर बँकेच्या सूत्राने दिली. रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) अदा करण्यासाठी या कर्जाचा उपयोग व्हावा, अशी सूचनाही बँकेने कारखानदारांना केली आहे. राज्य शिखर बँकेने गतवर्षी कारखान्यांना 2200 कोटींचे रुपयांचे तारणकर्ज दिले होते. यंदा या बँकेने साखरेच्या किमतीत 300 रुपये प्रतिक्विंटल कपात गृहीत धरल्यामुळे साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. तथापि, गाळप हंगामातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी या कर्जाचा कारखान्यांना मोठा आधार मिळालेला आहे.

कर्जवाटपात राजकीय भेदभाव?
तारणकर्ज मंजूर करताना राज्य सहकारी बँकेने तीन महिन्यांची साखर किमतीची सरासरी व सद्याचे साखरेचे दर गृहीत धरलेले आहे. तथापि, जे साखर कारखाने या गाळप हंगामात सुरु होणार नाही, त्यांच्या कर्जासाठीची भूमिकाही बँक लवकरच बदलणार असल्याचे सूत्र म्हणाले. तसेच, ज्या साखर कारखान्यांनी आपल्याकडील कर्जे भरलेली नाहीत. त्यांना कर्जे देतानाही बँकेने सावध भूमिका घेतली आहे. सद्या राज्यातील बहुतांश कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, त्यांना तारणकर्ज देताना राजकीय भेदभाव होत असल्याचा आरोपही होत आहे. बहुतांश कारखाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, त्यांना अडचणीत आणण्यासाठी जाचक नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळेच मागणीपेक्षा कमी कर्ज मंजूर केले जात असल्याचेही कारखान्याच्या संचालकांनी सांगितले. कर्जे थकित असल्यामुळे 2006 मध्ये राज्य सहकारी बँकेने 26 कारखाने विक्रीस काढले होते. नंतर हे कारखाने खासगी कारखानदारांना चालविण्यास देण्यात आले होते. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेकांनी न्यायालयात याचिकादेखील दाखल केलेल्या आहेत. गतवर्षी कर्जे थकित असल्याने राज्य बँकेने कारखान्यांची मालमत्ता जप्त करून पैकी सात कारखान्यांच्या विक्रीसाठी टेंडरही प्रसिद्ध केले होते. या विक्रीतून 300 कोटी रुपये वसूल करण्याचे राज्य बँकेचे नियोजन आहे.

बंद कारखानेही सुरु करण्यासाठी प्रयत्न!
जे साखर कारखाने या हंगामात सुरु होणार नाहीत, ते सुरु होण्यासाठी बँक टेंडर काढणार असून, ते विक्री किंवा चालविण्यासाठी देण्याचे नियोजनही राज्य बँकेने केले आहे. राज्य बँकेचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे यांच्या माहितीनुसार, बँकेने राज्यातील 32 साखर कारखान्यांना साडेतीन हजार कोटींचे तारण कर्ज वाटप केले असून, त्यातून त्यांनी एफआरपीची किंमत अदा करावी, अशी सूचना करण्यात आलेली आहे. सद्याचे साखरेचे दर व गत तीन महिन्यातील साखरदराची सरासरी काढूनच हे कर्जवाटप निश्चित केले गेले असल्याचेही सुखदेवे यांनी सांगितले.