पुणे । पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने यंदाही श्रीकृष्ण विचारांनी रुग्णसेवेची दहिहंडी उत्सव ससून हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी 1400 सुगंधी दुधाच्या पिशव्यांची दहीहंडी उभारून आर्थोपेडिक वॉर्डमधील रुग्ण तेजस उकरंडे या गोविंदाच्या हस्ते प्रतिकात्मकरित्या दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी साखळीपीरचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, शिवाजीराव कचरे, रुग्णालयाचे नवनाथ जगताप, अनुज भंडारी, ससूनचे डॉ. मनजीत संत्रे, अशोकराव गोडसे आदी उपस्थित होते.
कचरे म्हणाले की, गणेशोत्सव किंवा दहीहंडीसारख्या महोत्सावांद्वारे एकी साधण्याची दूरदृष्टी ठेवून हे उत्सव सुरू केले होते. परंतु दिवसेंदिवस यात व्यावसायिकता वाढत असून 10 वर्षांपासून या दोन्ही संस्थांनी नवीन पायंडा पाडून सुरू केलेला हा महोत्सव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. माळवदकर म्हणाले, कोणताही बडेजावपणा न करता यंदाही दहिहंडी साध्या पद्धतीने साजरी केली. प्रत्येक सार्वजनिक कामात पुण्याचा नेतृत्व करण्याचा गुण या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गिरविला गेला असे म्हटल्यास वावगे होणार नाही.