जळगाव । महानगर पालिकेची मालकी असलेल्या सागर पार्कवर लवकरच जॉगिंग पार्क तयार करण्यात येणार आहे. तसेच या मैदानाला संरक्षक भिंत बांधून आतमध्ये हायमस्ट लँम्प व फ्लॉवर बेटसह चौफेर वृक्षरोपण करण्यात येणार आहे. यासाठी वास्तुविशारद प्रकाश गुजराथी यांनी डिझाईन तयार केल्याची माहीती उपमहापौर ललित कोल्हे व नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली. सागर पार्क मैदानाच्या सुरक्षितेसाठी त्यास संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यास एक मोठे प्रवेशद्वार करण्यात येणार आहे. रात्री गेट बंद करण्यात येईल तर दिवसभर नागरिकांसाठी ते खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच कंपाऊंडच्या बाहेर मैदानाच्या चौफेर वृक्षरोप करण्यात येणार आहे. यावेळी मोठी वाढलेली रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
सुशोभीकरणाचा निर्णय
शहरातील सागरपार्क मैदानाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची असल्याचा निकाल दिला आहे. सागरपार्कवर सिवीक सेंटरचे आरक्षण असले तरी त्याचा विकास लगेच करणे शक्य नाही. त्यामुळे तूर्त या पार्कचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा सुरक्षित राहावी यासाठी व जेष्ठ नागरिकांना त्यावर फिरता यावे यासाठी येथे चारही बाजूने जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. जॉगिंग ट्रॅक झाल्यास परिसरासह शहराच्या हायवेपलिकडील दक्षिण उपनगरांमधील हजारो नागरिकांना कुटुंबियांसहित या फ्लॉवरबेटचा उपयोग होईल. तसेच तरुणाई व महिला वर्गासह ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक सुदृढतेसाठी निसर्गरम्य अशा ओपन जिमचा लाभ मिळू शकेल.
पेव्हर ब्लॉकचा ट्रॅक
या ठिकाणी मैदानाच्या चारही बाजूंना शेजारी शेजारी दोन ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. एक ट्रॅक पेव्हर ब्लॉक असलेला पक्का असणार आहे. तर दुसरा हा मातीचा कच्चा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. घुडघेदुखीचा त्रास टाळण्यासाठी मातीची ट्रॅक असेल तर पावसाळ्यासाठी पक्का ट्रॅक असेल. सागर पार्कवर नागरिकांना फिरण्यासाठी सुविधा तसेच कार्यक्रमांसाठी जागा खुली ठेवण्यात येणार आहे.
ठिकठिकाणी बाकांची सुविधा
जॉगिंग ट्रॅकसह जेष्ठ नागरिक व लहान मुलांना बसण्यासाठी ठिकठिकाणी 30 बाके ठेवण्यात येणार आहेत. मैदानाच्या चारही कोपर्यांना फ्लॉवर बेट विकसीत करण्यता येईल. तसेच मुलांसाठी खेळणी व एका कोपर्यात ओपन जीमही करण्यात येणार आहे. मैदानाच्या चारही बाजूला हायमस्ट लँम्प लावण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत व पहाटे देखील जॉगिंग करणे शक्य होणार आहे. बाकडे ठेवण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी तेथे येवून विविध उपक्रम घेता येतील.