पिंपरी : भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेतर्फे, दि. 4 जानेवारी रोजी गिरीजा लांडगे व सई भालेघरे या दोन बालगिर्यारोहकांचा सन्मान आ. महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या पैकी गिरीजा धनाजी लांडगे, हिचे वय 9 वर्षे असून तिने वयाच्या 4 थ्या वर्षापासून गडकिल्ले भटकंतीस सुरुवात केली. आजवर तिने सह्याद्रीतील 51 किल्ले पादाक्रांत केले आहेत. 25 ते 28 ऑक्टोबर या 4 दिवसांत तिने नाशिकमधील 12 किल्ले सर केले. वयाच्या 8 व्या वर्षी लिंगाणा सर करणारी ती पहिली मुलगी आहे. वयाच्या 9 व्या वर्षी अतिकठीण श्रेणीतील वजीर सुळका सर करणारीही ती पहिली मुलगी आहे. गडकिल्ले भटकंती बरोबरच स्केटिंग, स्विमिंग व थलेटिक्सचाही सराव ती करते सई मनोज भालेघरे, हिचे वय 11 वर्षे आहे. तिने सह्याद्रीतील 50 हून अधिक गडकिल्ले सर केले आहेत. सह्याद्रीतील अतिकठीण अश्या अलंग, मदन व कुलंग या दुर्गत्रयीवर तिने यशस्वीपणे चढाई केली आहे. लोणावळ्याजवळील कठिण श्रेणीतील तैलबैला सुळकाही तिने सर केला आहे.प्रस्तरारोहणातील प्रशिक्षणासह कराटेमध्येही ती ब्लॅकबेल्ट धारक आहे.
हे देखील वाचा
गिर्यारोहण या साहसी खेळाबाबत समाजात जागरूकता व्हावी व शालेय जीवनातच मुलांना या खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच आपल्या शहरातही चांगले गिर्यारोहक घडावेत यासाठी सागरमाथा गिर्यारोहण संस्था कार्यरत असून गिरीजा व सई या बालगिर्यारोहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती संस्थापक सचिव प्रशांत पवार यांनी दिली.
या कार्यक्रमात एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी साहसी खेळाबाबत मार्गदर्शन केले तर आ. महेश लांडगे व नगरसेवक जितेंद्र पवार यांनी या बालगिर्यारोहकांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास नगरसेवक सचिन चिखले, बापू घोलप, दुर्ग अभ्यासक निलेश गावडे व विरगळ अभ्यासक अनिल दुधाने आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली तर गडकिल्ले सेवा समिती व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे विचार मंच यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन ब. हि. चिंचवडे यांनी केले.