नवी दिल्ली: गुजरातच्या कच्छ भागातून पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडोज भारतात घुसणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या माहितीनंतर गुजरातमधील सर्व बंदरांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमांडोज गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला किंवा जातीय हिंसा घडवण्यासाठी समुद्र मार्गे भारताच्या हद्दीत घुसणार असल्याची माहिती मिळाली आहे. अडानी पोर्ट्स आणि SEZच्या विधानानुसार, पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडोज हरमी नालाद्वारे कच्छच्या खाडीत घुसले असल्याची सुचना कोस्ट गार्ड स्टेशनकडून मिळाली होती. या कमांडोजना पाण्यातून हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे मानले जात आहे. यामुळे गुजरातमधील कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंद्रा बंदराच्या सर्व जहाजांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या पाहिजेत आणि दक्षता देखरेख ठेवली पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे.