सागर घरुन निघाल्याची माहिती देणारा चौथा आरोपी अटकेत

0

भुसावळ हत्याकांड ; मयत सागर थोरातवर एमपीडीएची कारवाई होती प्रस्तावित

जळगाव- भुसावळ शहरात रविंद्र खरात यांच्यासह पाच जणांचा खूनप्रकरणी तीन जण अटकेत असून यात आणखी आकाश सुकदेव सोनवणे वय 19 याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या आकाश सागर खरात याच्यावर पाळत ठेवून तो घरुन निघाल्याची माहिती मारेकर्‍यांना पुरवित होता. सागर दुचाकीवरुन चर्चकडे येत असल्याची टीप आकाशकडून मिळाल्यानंतरच मारेकर्‍यांनी धावत्या दुचाकीवरुनच दुचाकीने येत असलेल्या सागरवर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सागरवर विविध गुन्हे दाखल असल्याने त्यानुसार त्याच्यावर एमपीडीएची कारवाई प्रस्तावित होती. घटनेपूर्वी त्याला नोटीस देवून 10 ऑक्टोबरला हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच 6 रोजी त्याचा खून झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

भुसावळ शहरात 6 रोजी रात्री गोळीबार व प्राणघातक हल्ल्यात भुसावळचे भाजप नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात, भाऊ सुनील, मुलगा सागर, रोहीत व सुमीत गजरे या पाचही जणांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर मारेकरी मोहसीन अजगर खान उर्फ बॉक्सर, मयुरेश रमेश सुरवाडे व शेखर हिरालाल मोघे उर्फ राजा बॉक्सर हे तिघे पोलिसांना शरण आले होते. ते तिघेही अटकेत असून पोलीस कोठडीत आहेत. त्याच्याकडून केलेल्या चौकशीत आणखी एकाचे नाव समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी घटनेतील चार क्रमाकांचा संशयित आकाश सोनवणे याला अटक केली.

मयत सागरवर एमपीडीएची कारवाई होती प्रस्तावित
आकाश सोनवणे याच्या अटकेला अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे. तसेच सागर याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दाखल विविध गुन्ह्याची कागदपत्रांनुसार त्याच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होती. त्याला याबाबत पोलीस ठाण्यात बोलावून नोटीसही देवून 10 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा खून झाला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बोलतांना दिली.

जप्त दोघे पिस्तूल कसे व कोठून आले?
खूनाच्या दिवशी पोलिसांनी दोन पिस्तूल जप्त केले आहे. त्यात एक पिस्तूल सागरचेचे असून त्याच्याच पिस्तूलने त्याच्यावर मारेकर्‍यांनी गोळी झाडल्याची माहिती समोर आली होती. मात्र या घटनेत पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल नेमके कोणाचे व कोठून आले, यासंदर्भात लवकरच समोर येईल, असेही अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.