पुणे । भूगाव येथे सुरू असलेल्या 61व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी अनेक मातब्बर पेहलवानांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. यात महाराष्ट्र केसरी गटातील प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या सागर बिराजदारलाही पराभवाचा धक्का बसला.बीडचा अक्षय शिंदे, कोल्हापूर शहरचा कौतुक डाफळे, पुणे शहरचा अभिजित कटके, सातार्याचा नीलेश लोखंडे यांनी मात्र उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेत गादी विभागात उपांत्यपूर्व फेरीत लातूरच्या सागर बिराजदाराला कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सहज नमविले.
सुरुवातीपासूनच कौतुकचे पारडे जड होते. अतिशय शांतपणे आणि सागरचा कल घेत तो खेळत होता. सुरुवातीला सागर मॅटच्या बाहेर गेल्याने कौतुकला एक गुण मिळाला. त्यानंतर त्याने एकेरी पट काढून 2 गुणांची कमाई केली. सागरची होणारी दमछाक स्पष्ट दिसत होती. त्यानंतर त्याने कुस्ती खेळण्यास टाळाटाळ केली. याचा पुरेपूर फायदा कौतुकने घेतला आणि लागोपाठ 2 वेळा मॅट बाहेर सागर गेल्याने आणखी 2 गुण कौतुकच्या पारड्यात जमा झाले. रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा वारसा लाभलेल्या सागरला आगेकूच करण्यात अपयश आले.
पुण्याच्या साईनाथचे आव्हान संपले
माती विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार मानला जाणारा पुण्याच्या साईनाथ रानवडेचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. बुलढाण्याच्या बाला रफीक शेखने त्याला 4-3 ने नमविले. बालारफीक शेख विजयाच्या तयारीनेच मैदानाच उतरला होता. सुरुवातीला पट काढण्याचा साईनाथने प्रयत्न केला, परंतु मॅटच्या बाहेर गेल्याने बाला रफीकला 1 गुण मिळाला. त्यानंतर बाला रफीकने पट काढून 2 गुणांची कमाई केली. या गुणांना साईनाथच्या प्रशिक्षकांनी हरकत घेतली, परंतु निकाल बालारफिकच्या बाजूने लागल्याने पुन्हा त्याला 1 गुण मिळाला. त्यानंतर साल्तो मारुन साईनाथ ने 2 गुण मिळविले, बालारफीकचा पाय मॅट बाहेर गेल्याने साईनाथला आणखी एक गुण मिळाला.
बाळासाहेब लांडगेचे निलंबन
पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यावर पुणे राष्ट्रीय तालीम संघाने निलंबनाची कारवाई करुन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे पत्राव्दारे सुचित केले आहे. पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य असलेले बाळासाहेब लांडगे यांना पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या हीताच्या विरोधात कृत्य करीत असल्याचा व तालीम संघाच्या विरोधात काम करत असलेल्या व्यक्तींना चिथवणी देऊन तालीम संघाची बदनामी करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप ठेवत त्यांना 21 दिवसापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्या नोटीसला कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्यामुळे राष्ट्रीय तालीम संघाने बाळासाहेब लांडगे यांना सदस्यपदावरुन निलंबत करुन घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. चौकशी समितीचा अहवाल येत पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर देण्यात आलेले प्रतिनिधीत्व ही रद्द करण्याचा निर्णय पुणे राष्ट्रीय तालीम संघाने घेतला आहे.