यावल- यावल प्रादेशिक वनविभागाच्या पश्चिम विभागाने सागवान लाकडाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची मिळताच कारवाई करीत चार चाकी, दुचाकी वाहन व सुमारे एक लाखांच्या सागवान लाकडासह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री नंतर तालुक्यातील आडगाव परीसरात करण्यात आली. प्रादेशिक वनविभाग यावल पश्चिमचे वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सोमवारी मध्यरात्री नंतर वनपाल एस.आय.पिंजारी, वनरक्षक ईश्वर मोरे, राकेश निकुंभे यांच्या सह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आडगाव रस्त्यावर सापळा रचला मध्यरात्री नंतर 12.30 वाजेच्या सुमारास संशयीत राजेंद्र काशिनाथ मिस्तरी (रा.आडगाव) यास सुमारे एक लाखांहून अधिकच्या सागवान लाकडासह पकडले. चारचाकी व दुचाकी ताब्यात घेण्यात आली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल यावल वनउपज केंद्रात सुरक्षीत ठेवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली.