साडेआठ लाखांचा अपहार : कोरपावलीच्या निलंबित ग्रामसेवकास दोन वर्षांनी अटक

0

यावल : तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीत झालेल्या अपहरण प्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर पसार असलेल्या निलंबित ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. कोरपावलीच्या तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे यांनी एप्रिल 16 ते जुन 16 या कालावधीत पती संदीप सीताराम जावळे यांच्या नावे वेळोवेळी एक लाख 55 हजार रुपयाची रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून काढली तसेच सरपंच यांनी संबधित काळात आठ लाख 46 हजार 500 रुपये काढून किर्द बुकात नोंद न करता परस्पर खर्च केल्याने सरपंचसविता जावळे यांना नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी 16 सप्टेंबर रोजी सरपंच पदासह सदस्य पदावरून अपात्र ठरविले होते तर याच प्रकरणात ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांना देखील 21 सप्टेंबर 2016 रोजी निलंबीत करण्यात आले होते. सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने शासनाच्या 14 व्या वित्त आयोगातील एकूण आठ लाख 46 हजार 500 रुपयांच्या निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय तुळशिराम मोरे यांच्याफिर्यादी वरून यावल पोलिसात 20 नोव्हेंबर 2017 मध्ये फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरपंच सविता जावळे यांना अटक झाली होती मात्र गेल्या दोन वर्षांपासुन ग्रामसेवक सुनील पाटील हे पसार होते. मंगळवारी रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी येथील सह दिवानी न्यायालयाचे न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्यांना 8 नोव्हेेंबरपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.