साडेचार कोटींचे सोने जप्त

0

मुंबई । महसूल व गुप्तचर संचालनालयाने शनिवारी मुंबई विमानतळावर विमानाच्या सीटखालून जवळपास साडेचार कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तीन प्रवाशांनी आपल्या सीटखाली हे सोने लपवले होते. त्या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून सोने लपवण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दिले होते अशी माहिती दिली आहे. मोहम्मद नावाच्या एका इसमाने दुबईमध्ये हे सोने दिले होते. भारतात उतरल्यावर एक व्यक्ती येऊन हे सोने घेईल, असे त्याने सांगितले होते, अशी माहिती अटक करण्यात आलेले आरोपी इमरान तजनीम, फरहद शेख आणि धर्मेश सोनी यांनी दिली.

मुंबई विमानतळावर उतरताच महसूल गुप्तचर संचालनालयाने तिघांनाही अटक केली आणि सोने जप्त केले. मोहम्मद याच्याबद्दल जास्त काही माहिती नसल्याचे या तिघांनी सांगितले. हे सोने नेमके कोण आणि कुठे घेऊन जाणार होते याबाबत माहिती नसल्याचे आरोपींनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सोनी आणि शेख हे मुंबईचे, तर इमरान दिल्लीचा रहिवासी आहे. अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत.