भुसावळ– सुरत येथून भुसावळात पाठवलेल्या साडेचार लाख रुपये किंमतीच्या कापडाची चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी पिता-पूत्रासह अटक केली आहे. रेल्वेच्या व्ही.पी.पॉईंटवरून पार्सल रवाना करण्यात येणार होते मात्र ट्रकमध्ये पार्सल न आढळल्याने चोरीचे बिंग फुटले. रवींद्रकुमार श्रीद्वारीका प्रसाद (रा. शहागंज जि. जोनपूर,ह.मु. जळगाव) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. संशयीत आरोपी तथा ट्रक चालक गौतम विनायक वाघ व त्याचे वडील विनायक वाघ हे ट्रक (जी.जे.05 बीव्ही 9667) मध्ये चार लाख 40 हजार 234 रूपये किंमतीचे कपड्यांचे 95 डाग सुरतच्या साईबाबा कॅरीअर कार्यालयातून निघाले मात्र रविवारी आरोपी वाहनासह रेल्वेच्या व्ही.पी.पॉईंटवर आल्यानंतर वाहनात कपड्यांचा माल न आढळल्याने संशय बळावला. आरोपींनी कपड्याच्या मालाची विल्हेवाट लावल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी, सहायक फौजदार फारूक शेख तपास करीत आहे.