साडेचार लाखांचे 45 मोबाईल फोन लंपास

0
भोसरी : मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून 45 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शरयू इंटरप्रायजेस येथे रविवारी उघडकीस आली. विशाल पाटील (वय 23, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचे भोसरी येथे शरयू इंटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास विशाल यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले. दुकानात ठेवलेले ओपो कंपनीचे 13 मोबाईल फोन, सॅमसंग कंपनीचे 13 मोबाईल फोन, विवो कंपनीचे 8 मोबाईल फोन, रेडमी कंपनीचे 3 मोबाईल फोन, लावा, टॅम्बो, जिओ कंपनीचे 7 आणि विशाल यांचा वयक्तिक वापराचा ओपोएफ कंपनीचा एक मोबाईल फोन आणि 8 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 67 हजार 210 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.