देहूरोड- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देहूरोड परिसरातील विविध शाळांमध्ये योगासनांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक आणि शहराबाहेरील प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी यात योगाभ्यासाचे धडे गिरवले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात बोर्डाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पतंजली योगपीठाचे प्रकाश दिसले, सचिन गावडे, गणेश शेलार, विजयकुमार मठपती, आशा सोनार, दिव्या दिक्षीत यांनी योगाचे धडे दिले. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, बोर्ड सदस्य रघुविर शेलार, गोपाल तंतरपाळे, ललित बालघरे, कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत, समन्वयक नरेंद्र महाजनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. त्र्यंबक वाघचौरे, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, कॅन्टोन्मेंटच्या विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी सव्वासातला सुरू झालेला कार्यक्रम सुमारे दीडतास सुरू होता. यामध्ये ओम्कार, विविध योगासने, प्राणायाम, श्वासावर नियंत्रण याबाबत तंत्रशुध्द पध्दतीने मार्गदर्शन करण्यात आले. पतंजली पीठातर्फे शहराच्या विविध भागात संपूर्ण आठवडाभर योगासनांचे मोफत वर्ग सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी मुख्य प्रशिक्षक प्रकाश दिसले यांनी दिली. बोर्डाचे सदस्य रघूविर शेलार यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सर्व शहरवासियांना निरामय जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. योगसाधनेचा अविष्कार, याोगासनांचे महत्व आणि आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत योगासनांचे महत्वाच्या मुद्यांवर शेलार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री शिवाजी विद्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व शाळा, विस्डम हायस्कुल, लायन्स क्लब हायस्कुल, सेंट ज्युड हायस्कुल आदी शासकिय आणि खासगी शाळांमधये जवळपास साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाचे धडे गिरवले.
‘योग’ निरामय आयुष्याची गुरुकिल्ली
योगासने ही निरामय आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सुखासीन जीवन जगण्याचा तो मार्ग आहे. आपल्या भारत देशाने जगाला दिलेल्या तो अनमोल खजिना आहे. दुर्दैवाने आपल्या देशात योगाचा संबंध आजकाल विशिष्ट धर्माशी जोडला जात आहे. ते सर्वथा चुकीचे आहे. भारताचा प्राचीन इतिहास चाळून पाहिला तर हिंदू, बौध्द, जैन आदी अनेक प्राचीन धर्मात योगासनांचे महत्व सांगण्यात आले आहे. म्हणून योग हा उत्तम जीवन जगण्याचा मार्ग म्हणन सर्वांनी स्विकारला पाहिजे, असे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी यावेळी केले.