साडेसहा कोटींचे अपहार प्रकरण : भुसावळात आर्थिक गुन्हे शाखेकडून संशयीताच्या घराची झडती

भुसावळ : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत साडे सहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुरुवारी संदीप प्रभाकर सावळे (36, रा.भुसावळ) यास अटक करण्यात आल्याने भुसावळात खळबळ उडाली. शुक्रवारी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने साबळे याच्या गणेश नगरातील घराची झडती घेतली मात्र त्यात काहीही आढळले आले नसल्याचे तपासाधिकारी निरीक्षक बळीराम हिरे म्हणाले.

बोगस लाभार्थी दाखवून केला अपहार
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने केलेल्या चौकशीत 702 बोगस लाभार्थी दाखवून महामंडळाचे अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी व 40 ते 50 एजंट अशांनी बोगस कागदपत्रांद्वारे तब्बल साडे सहा कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली अनिश जाधव यांच्या फिर्यादीवरुन 2 ऑगस्ट 2019 रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होवून तो जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात या आधी महामंडळाचा व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे (46, रा.नाशिक), अकांऊटंट सागर वसंत अडकमोल (39, रा.रवीराज कॉलनी), सुनंदा बाबुराव तायडे (59, रा.वानखेडे हौसिंग सोसायटी), प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (रा.राधाकृष्ण नगर), अमरीश अनिल मोकाशी (रा.सदगुरु नगर) व संजीव वसंत सोनवणे (रा.भुसावळ) यांना अटक झाली आहे तर मुकेश देवराम बारमासे (रा.नागपूर) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

भुसावळातील संशयीताला अटक
गुरुवारी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून संदीप सावळे यास अटक केली व त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान शुक्रवारी, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम हिरे, हवालदार चंद्रकांत शिंदे, राजेंद्र पाटील, अधिकार पाटील व भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी गणेश नगरातील संदीप सावळे याच्या घराची झडती घेतली मात्र त्यात काहीही आढळले नसल्याचे हिरे यांनी सांगितले.