साडेसात महिने पुरेल इतका पाणीसाठा

0

खडकवासला । खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत मिळून 10.06 टीएमसी म्हणजे 34.52 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला किमान साडेसात महिने पुरेल एवढा असून, त्यातून शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तने देता येतील. गेल्या वर्षी आजच्या दिवशी चार धरणांत 14.32 टीएमसी म्हणजे 49.11 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. हा साठा गेल्या वर्षीपेक्षा चार टीएमसी कमी आहे.

29.15 टक्के साठा
वरसगाव व टेमघर धरणाच्या भिंतींना गळती लागल्याने ही धरणे दुरुस्तीसाठी मागील वर्षी रिकामी केली होती. या दोन्ही धरणांत 0 टक्के पाणी शिल्लक होते. आजअखेर टेमघर धरणात 0.49 टीएमसी म्हणजे 13.26 टक्के, तर वरसगाव धरणात 3.43 टीएमसी पाणी जमा झाले आहे. पानशेत धरणात 5.56 टीएमसी म्हणजे 52.26 टक्के, खडकवासल धरणात 0.29 टीएमसी म्हणजे 29.15 टक्के साठा जमा झाला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.

236 मिलिमीटर पाऊस
शनिवारी सकाळी मागील 24 तासांत टेमघर येथे 102, वरसगाव येथे 73, पानशेत येथे 65, खडकवासला येथे 20 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 1 जूनपासून टेमघरला 1159, पानशेत येथे 727, वरसगाव 759, खडकवासला 236 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. वरसगाव धरणातील दासवे लवासा धरण येथे 24 तासांत 140 मिमी, तर एक जूनपासून 1757 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.

पानशेत निम्मे भरले
पानशेत धरणाची एकूण क्षमता 10.65 टीएमसी आहे. या धरणात 24 व 25 जून रोजी 23.60 टक्के पाणीसाठा होता. तो 52.26 टक्के झाला आहे.