साडेसात हजारांची लाच घेताना साक्रीतील लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात

साक्री : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थीला धनादेश देण्यासाठी साडेसात हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या साक्री पंचायत समितीतील लाचखोर कंत्राटी अभियंत्याला धुळे एसीबीने पंचायत समितीतच लाच स्वीकारताच अटक केली. बुधवारी दुपारी झालेल्या सापळ्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. वैभव हिंमत हालोरे (24, रा.बळसाणे, ता.साक्री) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

पंचायत समितीत स्वीकारली लाच
30 वर्षीय तक्रारदाराला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर आहे. घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजरी मूल्यांकन करून घरकुलाचा पुढील धनादेश मिळून देण्याच्या मोबदल्यात कंत्राटी अभियंता वैभव हालोरे याने बुधवारी लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने साडेसात हजार रुपये देण्याचे मान्य करीत एसीबीकडे तक्रार नोंदवली. दुपारी पंचायत समिती कार्यालयातच आरोपीला लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संदीप कदम, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.