सातच मंडळांनी केली ऑनलाइन नोंदणी

0

जळगाव: नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्ताची लगबग वेगात सुरू झाली आहे. श्री मूर्तीच्या स्थापना, परवानगी, गणरायासाठी व्यासपीठ, डेकोरेशन आदी तयारीत कार्यकर्ते गुंतले अाहेत. गणेशोत्सवासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी जमा करण्यात येणाऱ्या वर्गणीच्या परवानगीकडे मात्र गणेशभक्तांची पाठ दिसून येत आहे. जिल्ह्यातील केवळ ७ गणेश मंडळांनीच आजपर्यंत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाइन नोंदणी केल्याची स्थिती आहे.

सर्व गणेश मंडळांना गणेश स्थापनेची सर्व विभागाची प्रशासकीय परवानगी एकत्रितरित्या मिळावी, यासाठी पोलिस मल्टीपर्पज हॉलमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात अाली आहे. यात वीज मंडळासह पोलिस, महापालिकेकडील परवानगी देण्यात येत आहे. मात्र, गणेशोत्सवासाठी लागणारा खर्च जमा करण्यासाठी देणगी घेण्यासाठीची परवानगीही धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून ऑनलाइन देण्यात येत आहे. www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही नोंदणी केला जात आहे. यावर मागील वर्षी मिळालेल्या परवानगीची प्रत, जागेचा ना हरकत दाखला, मंडळाचा ठराव, ग्रामसेवक, नगरसेवकाचे शिफारसपत्र ही कागदपत्रे डाऊनलोड करुन विविध नमुन्यातील अर्ज भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येत आहे. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या मंडळांना ई-मेलद्वारेच परवानगी पत्र देण्यात येते. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून केवळ उत्सवासाठी देणगी स्वीकारण्याचीच परवानगी दिली जात अाहे.