मुंबई । यंदाच्या हिरो इंडियन सुपर लिगमध्ये सर्व संघांच्या तुलनेत केवळ मुंबई सिटी एफसी सध्या बलवान संघ वाटत आहे. बंगळुरू एफसीचे अल्बर्ट रोका आणि नव्या संघाची सुत्रे स्वीकारलेले स्टीव कॉप्पेल यांचा अपवाद सोडल्यास प्रशिक्षक कायम असलेला एकमेव संघ मुंबई हाच आहे. आयएसएलमध्ये प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती झालेले अलेक्झांड्रे गुईमाराएस हे एकमेव प्रशिक्षक आहेत. गेल्या मोसमात कोस्टारीकाच्या या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपांत्य फेरी गाठत मुंबई सिटीने सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. या संघाने बाद फेरीतही साखळी लढतींमधील खेळाचे सातत्य राखले असते तर त्यांना अंतिम फेरी सुद्धा गाठता आली असती, पण त्यांचा एटीकेकडून पराभव झाला. एटीकेने नंतर विजेतेपद मिळविले. गेल्या मोसमात मुंबई सिटी संघाने चांगली क राहिले. त्यांनी साखळी लढतींमध्ये अव्वल स्थान राखले. त्यांच्याविरुद्ध केवळ 11 गोल झाले. यातील तीन एटीकेविरुद्ध उपांत्य फेरीत झाले. आता या मोसमात एक पायरी वरची गाठण्यासाठी मुंबई सिटीने गुईमाराएस यांची फेरनियुक्ती केली आहे.
त्यांच्या क्षमतेवर क्लबने विश्वास ठेवणे स्वाभाविकच आहे. गुईमाराएस यांनी सांगितले की, सातत्य हेच निर्णायक महत्त्वाचे आहे. याशिवाय मी आणि मुंबई सिटी क्लबचे बोर्ड यांच्यात उत्तम संबंध निर्माण झाले आहेत. त्यांना मी जवळून माहिती झालो आहे. यंदा मोसमपूर्व तयारीसाठी मी काय योजना आखल्या आहेत याची त्यांना कल्पना आहे. मुख्य म्हणजे गेल्या मोसमातील कामगिरीमुळे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ प्रशिक्षकच नव्हे, तर मुंबई सिटीने गेल्या मोसमातील वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या खेळाडूंना कायम ठेवले आहे. यात गोलरक्षक अमरींदर सिंग, तसेच भक्कम बचाव केलेल्या ल्युसीन गोऐन आणि गेर्सन व्हिएरा यांचा समावेश आहे. मध्य फळीत लिओ कोस्टा आणि सेहनाज सिंग यांच्यासाठी पसंती कायम राहिली.