पालघर (संतोष पाटील) : पालघर तालुक्यातील सातपाटी फड स्मशानभूमीजवळील तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असुन आज त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
राकेश मोरे, निकेत मोरे, प्रल्हाद मोरे व रामकृष्ण मोरे या चौघांनी स्मशानभूमी जवळील मोठ्याप्रमाणावर तिवरांची झाडे तोडून त्या जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार सदाशिव ह.माळी, प्रवीण ब.माळी व इतर दोघांनी महसूल विभागाकडे केली होती. प्रांताधिकारी विकास गजरे ह्यांच्या समोर 13 एप्रिल व 24 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत हे अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्या त्याअनुषंगाने प्रांताधिकार्यांच्या आदेशानुसार तहसीलदार महेश सागर(पथक प्रमुख) ह्यांनी स्वतः सागरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक रुपाली गुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दळवी, प्रदूषण मंडळाचे होळकर ई.च्या पथकाच्या सोबत ड्रोनच्या सहाय्याने ह्या अतिक्रमनाची पाहणी केली. त्यावेळी तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्यता आढळून आल्यानंतर मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील ह्यांच्या फिर्यादी वरून वरील चार लोकांविरोधात भारतीय वन पर्यावरण अधिनियम 1986 चे कलम आणि भादवी कलम 447,34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जमीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.