सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी बालकांना केले घरपोच लसीकरण

0

यावल । सातपुड्यातील अतिदुर्गम भागात तब्बल 12 किमी पायी जाऊन दोन डॉक्टरांसह सहा जणांच्या पथकाने बालकांना लसीकरण केले मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत आदिवासीं बालकांना घरपोच लसीकरणाचा लाभ देण्यात आला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदुर्गम भागात मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम राबवण्यात आली. तालुक्यातील हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सातपुड्याच्या कुशीत चारमळी हा आदिवासी पाडा आहे. त्या पुढे सातपुड्याच्या जंगलवाटेवर रूईखेडा वस्ती आहे. हिंगोणा येथून चारमळीपर्यंत वाहन जाते. मात्र, तेथून पुढे सहा किमी अंतरावर सातपुड्याच्या जंगलात रूईखेडा या वस्तीत जाण्यासाठी पायी जावे लागते. या वस्तीतील बालकांना लसीकरण करण्यासाठी दोन डॉक्टारांसह सहा जणांचे पथक चारमळीहून लसीकरणाचे साहित्य घेऊन सहा किमी पायी चालत गेले.

हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सहायक बी. बी मानकरे, ए. डी. तायडे, आरोग्य सेवक के. पी. तायडे, पी.पी. फालक, परिचर कैलास कोळी, आरोग्य सेविका अशा टोके, प्रेमलता चौधरी यांचा पथकात समावेश होता.