तळोदा (सुनील सूर्यवंशी) । सातपुड्यातील गिधाडांच्या संवर्धनासाठी अखेर थोड्याफार प्रमाणात निधी वनविभागाला मिळाला आहे.पर्यावरणातील स्वच्छतादूत म्हणून ओळखली जाणारी सातपुड्यातील गिधाडे घातक औषधांमुळे व खाद्याअभावी नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. मात्र तळोदा वनक्षेत्र अंतर्गत असणार्या गोर्यामाळ टेकडी परिसरात दुर्मिळ गिधाडबाबत खानावळ तयार करण्यात आली होती. निधी अभावी त्याची सुरुवात होण्यास विलंब् होत होता. आता मात्र अल्पप्रमाणात प्राथमिक निधी उपलब्ध झाला असून परिसरातील दुर्मिळ गिधाडांना स्थानिक पातळीवर सुरक्षित मृत जनावरे अन्न म्हणून देण्यास सुरुवात झाल्याने आता गिधडांची संख्या लवकरच वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याठिकाणी देखरेखीसाठी एक वनमजूर व नियमित मांस पुरवण्यासाठी व ने आण करण्यासाठी एक वनमजूर, मांस खरेदी करण्यासाठी व मांस ठेवण्यासाठी एक शितपेटी अशी यंत्रणा तयार झाली आहे.
गोर्यामाळजवळ खानावळ
तळोदा वनक्षेत्रात असणार्या परिसरात उंचकडे कपारित या दुर्मिळ पक्षीच अस्तित्व आहे.यांची संख्या 15 ते 16 असून या टेकडीच्या खाली सुरक्षितपणे मांस खाता यावे म्हणून सर्वंधन केंद्र उभारणीसाठी वनक्षेत्रपाल अशोक पाटील मागील काळापासून पाठपुरावा करीत होते.
हा आहे धोका
डायक्लोफिनॅक औषधामुळे हा पक्षी संकटात सापडल्याने रेस्टॉरंटचा चांगला पर्याय पुढे आला आहे. मृत जनावरे मुख्य अन्न असणार्या गिधाडांना डायक्लोफिनॅक औषधाचा फटका बसला आहे. डायक्लोफिनॅक हे जनावरांसाठीचे पेनकिलर आहे. जनावरांच्या विविध रोगांवरील उपचारात वापरले जाणार्या या औषधाचा एक टक्का अंश जरी मृत जनावरांत असली तरी ते गिधाडांसाठी धोक्याचे ठरते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स यांनी पुढाकार घेतल्याने डायक्लोफिनॅकवर बंदी घालण्याचा आदेश केंद्र शासनाने काढला होता. यास पर्याय असलेले अँसिक्लोफिनॅक व केटोप्रोफेनमध्येही त्याचा अंश असल्याचे राजस्थान विद्यापीठाच्या पशुविज्ञान विभागाच्या तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. घातक विषयुक्त घटक गिधाडांसाठी धोकादायकच असल्याचे पुढे आले.
असे आहे गिधाड रेस्टॉरंट
एक एकर जागेवर तारेचे कुंपण घातले जाते. ही जागा गिधाडांसाठी राखीव असते. या ठिकाणी साधारणत: 15 बाय 20 फुटाचा व एक फूट उंचीचा ओटा बांधण्यात येतो. तेथे मृत जनावरे टाकली जातात. मृत जनावरांच्या शरीरात डायक्लोफिनॅक औषधाचा अंश नसल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी करतात. गिधाडांना खाद्य मिळाल्याने त्यांच्या प्रजननात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
बोकडाचे मांस मिळणार
या घातक रसायनाच आवाहन बघता वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांनी तळोदा पालिका हद्दीतील अधिकृत मटनविक्री दुकानांवरून सुरक्षित मांस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे तळोदा शहरातील खवव्ये ज्या दुकानांवरून बोकडच मास खरेदी करतात त्याच दुकानावरून गिधाडासाठी देखील आता मांस खरेदी केले जाणार आहे. यामुळे सुरक्षित अन्न उपलब्ध होणार आहे.
वन्यजीव अधिनियमानुसार गिधाडांची गणना
गिधाडांची गणना शेड्यूल एकमध्ये केली आहे. यात वाघ व गेंड्यांचा समावेश आहे. देशात वाघांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत मात्र गिधाडांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नव्हते.गिधाड हा स्वच्छतेचे काम प्रभावीपणे पार पाडणारा निसर्ग अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण पक्षी आहे. निसर्गचक्रात मृत पावलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावणे, कुजलेले मांस खाणे हे गिधाडाचे काम आहे. या भागात इजिप्शियन, भारतीय लांबी चोचीचे गिधाड,पांढर्या पुढ्याचे गिधाड आदि प्रकारची गिधाडे आढळतात. गिधाड पक्ष्यांना वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 मधील अनुसूचीमधून अनुसूचीमध्ये समाविष्ट करून त्यास कायदेशीररित्या संरक्षण प्राप्त करून दिलेले आहे.मात्र आता या नवीन संकल्पनेमुळे सातपुड्यात गिधाडांची संख्या वाढण्यास मदत होईल. शासनाकडून अधिक निधी उपलब्ध झाल्यास अधिक चांगले संवर्धन होऊ शकते.
वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांच्या प्रयत्नांनी अखेर रेस्टॉरंट झाले कार्यान्वित
रेस्टॉरंटची संकल्पना पुढे आली असून ती यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांनी केले होते. गोर्यामाळ या ठिकाणी खानावळसाठी लागणारे साहित्य पोहचवून तिथे काम पूर्ण झाले असून गिधाडचा वावर असणार्या भागात एका सुरक्षित जागेला तारेचे कुंपण लावून परिसरात काँक्रीटचे खांब उभे करण्यात आले आहेत.
जनजागृती अभियान
तळोदा वनक्षेत्र अंतर्गत येणार्या चांदसैली घाटाच्या परिसरात गिधाड वावर असणार्या वनक्षेत्रात गतवर्षी गिधाड संवर्धनदिन साजरा करण्यात आला होता. 3 सप्टेंबर या दिवशी गिधाड जनजागृतीसाठी वाल्हेरी ढेकाटी, आमोनी, बोरवन, या ठिकाणी ग्रामसभा घेऊन लोकांना गिधाडांचे महत्व पटवून देण्यात आले व गिधाडांचे अस्तित्व जतन करण्यासाठी वनविभागाकडून आवाहन करण्यात आले होते त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.