सातपुड्यात वन्यप्राण्यांचे दर्शन

0

खिर्डी। बुद्ध पौर्णिमेला महाराष्ट्रभर वन्यजीव प्राणी गणना केली जाते. यामध्ये सातपुडा परिसरात रात्रभर मचानीवर स्वयंसेवी संस्था व वनरक्षक मिळून पाणवठ्याजवळ पाणी पिण्यासाठी येणार्‍या प्राण्यांची गणना केली. यात अस्वल, कोल्हे, हरीण, रानडुक्कर, रानमांजर आणि मध्यरात्री तोंडात शिकार घेवून आलेल्या बिबट्याने दर्शन दिले. यावेळी निरीक्षकांना वनसंपदेने नटलेल्या या सातपुड्यातील वन्य जीवांना जवळून निहाळण्याचा अनुभव आला. याबाबतचे सर्व अहवाल वनविभागाकडे जमा करण्यात आले.

जंगलातील प्राण्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यभरातील विविध अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात वन्यप्राणी व पक्षी गणनेसाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव परिसर यांनी अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील यावल वन्यजीव अभयारण्यात उसमळी, गारड्या, करंजपाणी, व लंगडाआंबा या ठिकाणी पाणवठ्यावर वन्यप्राणी व पक्षी गणनेसाठी सहभाग घेतला. या गणनेसाठी वनाधिकार्‍यांनी पाणवठ्यांचे नियोजन करुन प्राणीप्रेमी व अभ्यासकांनी चोवीस तास अभयारण्यात प्राण्यांची व पक्ष्यांची गणना करण्यात आली. चार पाणवठ्यांच्या शेजारी बारा मचाणांवर स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक व वनखात्याचे एकूण 36 प्रगणक सहभागी झाले.

या प्राण्यांचा आढळला अधिवास
जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील यावल वन्यजीव अभयारण्य बिबट वाघ व अस्वलाच्या प्रसिद्धीस आलेले आहे. सलग चोवीस तास होणार्‍या या गणनेत बिबट, अस्वल, निलगाय, चितळ, चौशिंगा, खोकड, कोल्हा, लांडगा, तडस, उदमांजर, रानडूक्कर, साळींदर असे प्राणी तर बुलबुल, घार, शिक्रा, गिधाड, मोर, घुबड, दुर्बल, तांबट, खंड्या असे पक्षी प्रामुख्याने निदर्शनास आले.

पाणवठ्यावर प्राण्यांची नोंद
बुद्ध पौर्णिमेला प्रगणना घेण्याचे निश्चित करण्यात येऊन यात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांना एक महिना अगोदर वन विभागाकडे अर्ज सादर करण्यात आला होता. सलग चोवीस तास होणार्‍या या प्राणीगणनेचा संपुर्ण आराखडा तयार करण्यात आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत ह्यावर्षी प्राणीगणनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाणवठ्यावर चोवीस तासांत आलेल्या प्रत्येक प्राण्यांची बारकाईने नोंद ठेवण्यात आली. प्राणीगणनेला जाण्यापुर्वी वन विभागाकडून स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांना योग्य त्या सुचना देऊन गणनेसाठी रवाना करण्यात आले. वनखात्याच्या निर्देशानंतरच स्वयंसेवकांना मचाणाच्या खाली उतरता येणार होते. सलग चोवीस तास गणना संपताच प्रत्येक मचाणाच्या जवळ वनखात्याची जिप्सी स्वयंसेवकांना घेण्यासाठी आली.

यांनी घेतले परिश्रम
या सर्वेक्षणासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आनिल महाजन यांचे मार्गदर्शनाखाली, उपाध्यक्ष शिवाजी जावरे, सचिव उदय चौधरी, लक्ष्मीकांत नेवे, समीर नेवे, सत्यपालसिंग राजपुत, बाबा जावळे, दिनेश पाटील, प्रशांत पाटील, संकेत पाटील, सादिक पिंजारी, केतन बोरसे यांचेसह यावल वन्यजीव अभयारण्याचे वन्यपाल पाटील, वनरक्षक मिलिंद जाधव, गणेश खंडारे, भरत बोरसे, एस.जी.जावध आदींनी परिश्रम घेतले.