सातबारा उतार्‍यासाठी शेतकर्‍यांची हेलपाटे

0

नगरदेवळा । येथून जवळच असलेल्या चुंचाळे व पिंपळगाव शिवारातील शेतकर्‍यांना संगणीकृत उतारे मिळवण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे. सदर गावातील तलाठी या शेतकर्‍यांना दररोज तारीख वर तारीख देत असून शेतकरी आपली रोजंदारी सोडून या उतारे मिळवण्यासाठी दररोज तलाठी कार्यालयात चकरा मारत आहे .बोंड आळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे पंचनामासाठी पीकपेरा लावलेले संगणीकृत उतारे आवश्यक असून जवळजवळ 8-10 दिवस उलटूनही शेतकर्‍यांना संबंधित तलाठीकडून उतारे दिले जात नाही तसेच आम्हांला फक्त इतकेच काम नसते. उद्या या, परवा या अशा स्वरूपाचे उत्तर तलाठी देतात, कोतवाल नसल्याने अनेक कामे तसेच राहत असून शेतकरी सैरभैर फिरत आहे. प्रत्येकवेळी रजिस्टरवर नाव लिहायला सांगत असून बर्‍याच शेतकर्‍यांनी दोन ते तीन वेळा नाव लिहून उतारा मिळत नाहीवरून तलाठी आपली जबाबदारी झटकतात. यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. संगणीकृत उतारे असल्यावरही देण्यास अडचण काय? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. इतर तलाठी कार्यालयात वेळेत उतारा मिळत असून मुदत संपल्यावर फॉर्म भरून द्यायचे का? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. वरीष्ठ अधिकारी वर्गाने याबाबत दखल घेणे गरजेचे असून संबंधीत तलाठ्याचे हे नेहमीचेच असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये होती.