यावल। येत्या 15 एप्रिलपर्यंत यावल तालुक्यातील संगणकीकृत 7/12 उतारे अपडेट झाले पाहिजे. त्यादृष्टीने दफ्यानुसार 7/12मध्ये दुरुस्ती (एडिटिंग)चे काम सुरू आहे. यासाठी तहसील आवारात तीन, तर दोन तलाठी कार्यालय असे पाच ठिकाणी वर्कस्टेशन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बसून तलाठ्यांनी आतापर्यंत 80 टक्के काम पूर्ण केले आहे. यावल तालुक्यात एकुण 74 हजार 831 सातबारे उतारे आहेत. या सर्व उतार्यांचे संगणकीकरण झाले आहे.
तलाठ्यांनी केले 59 हजार 787 सातबारा अपडेट
यानंतर शेतकर्यांकडून केले जाणारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार, इतर नोंदी घेणे बाकी होते. त्यामुळे संगणकीकृत सातबारांमध्ये दुरुस्ती करून सर्व उतारे अपडेट करावे, अशा सूचना होत्या. यानुसार कामाला लागलेल्या तलाठ्यांनी आतापर्यंत तालुक्यातील 59 हजार 787 सातबारा अपडेट केले आहेत. आता उर्वरित काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण व्हावे यासाठी तहसीलदार कुंदन हिरे आग्रही आहेत. हे काम वेळेत पूर्ण करणे शक्य व्हावे, यासाठी यावल तहसीलच्या आवारात तीन, न्हावी आणि यावल शहर तलाठी कार्यालयात असे दोन वर्कस्टेशन उभारून तेथे इंटरनेट जोडणी देण्यात आली आहे. येथे बसून तलाठी सातबारांमध्ये दुरुस्ती करत आहेत. तसेच दफ्यानुसार पाहणी करत दुबार सातबारे डिलीट करण्याचे कामही सुरू आहे.
40 इंटरनेट कनेक्शन
उतारे दुरुस्तीचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी तहसीलदार कुंदन हिरे यांनी बीएसएनएल ब्रॉडबँडचे 8, एअरटेल 16 केबल इंटरनेट हॉयस्पीड 16, असे एकूण 40 इंटरनेट कनेक्शन घेतले आहेत. यावर 35 सजे, 4 मंडळाधिकारी कार्यालयातील कर्मचारी काम करत आहेत.