उतार्यावरून नावे झाले कमी, जमीनही गायब
आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांचे 7-12 व 8 अ उतारे संगणकीकृत करताना मोठ्या चुका झाल्याया असून, सातबारा उतार्यावरील नावे कमी झाली आहेत. तसेच, समाईक क्षेत्रावरील नावे कमी झाले आहेत. तर, अवसरी बुद्रुक येथील प्रताप रत्नाकर हिंगे यांच्या नावावरील 20 गुंठे जमीन गायब झाली आहे. 20 गुंठे जमीन पुन्हा नावावर करण्यासाठी घोडेगाव येथे हेलपाटे मारूनदेखील कोणीही दाद देत नसल्याने लवकरच जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रताप हिंगे यांनी सांगितले.
अवसरी बुद्रुक येथील प्रताप रत्नाकर हिंगे यांच्या नावावर चवरेमळा, हिंगेवस्ती येथील अर्धा एकर/20 गुंठे जमीन आहे. मागील वर्षी त्याच्या नावावरील 20 गुंठे जमीन गायब होऊन त्यांच्या 7-12 वरील क्षेत्राला आळे करण्यात आले. त्यानंतर हिंगे यांनी तलाठी कार्यालयात गेल्या वर्षापासून हेलपाटे मारल्यानंतर त्यांना सांगण्यात आले, की तुमचा 7-12 दुरुस्त करण्यासाठी 155 अंतर्गत तहसील कार्यालयात अर्ज करा. त्यासाठी जुना हस्तलिखित 7-12 उतारा नवीन संगणीकृत उतारा व अर्ज अशी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्यानंतर तुमचे काम होईल, असे तलाठी कार्यालयात सांगण्यात आले. त्यामुळे प्रताप हिंगे यांना एक वर्ष तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. याबाबत तहसीलदार सुषमा पैकीकरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की तुमच्या नावावरील क्षेत्र कमीजास्त झाले त्यासाठी सातबारा उतार्याची चौकशी करावे लागेल.
खासगी कॉम्प्युटर चालकांचा आधार
आंबेगाव तालुक्यातील सर्वच गावांतील महसूल विभागामार्फत 7-12 व 8 अ उतारे संगणीकृत करण्याचे कामचालू आहे. आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ तलाठी, मंडलाधिकारी यांना कॉम्प्युटरचा अनुभव नसल्याने अनेक तलाठ्यांना खासगी कॉम्प्युटर चालकांकडून तालुक्यातील शेतकर्यांचे सातबारा, 8अ संगणीकृत करून घ्यावे लागत आहेत. हे करत असताना अनेक शेतकर्यांची नावे सातबारा उतार्यावरून कमी झाली आहेत.