धुळे । सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करा, नीती आयोगाची फेररचना करा आदी मागण्यांसाठी गुरूवारी सकाळी 11 वाजता भारतीय मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनात प्रांताध्यक्ष शिवाजीराव काकडे, जिल्हाध्यक्ष सुनिल देवरे, जिल्हा सरचिटणीस घनःशाम जोशी, संघटन सचिव बी.एम.कुळकर्णी यांच्यासह संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनात म्हटले आहे की, आयएलओ पुरस्कृत केलेले स्टॅण्डर्ड व शिफारशी याचे भान कामगार कायद्यात सुधारणा करतांना ठेवले गेले पाहिजे, कामगार क्षेत्राविषयी धोरण ठरवितांना त्रिपक्षीय चर्चा पध्दत अवलंब करावा, नीती आयोगाच्या वेबसाईटवरील कर्मचारी विरोधी प्रस्ताव व अन्य प्रस्ताव की जे फेटाळले आहेत ती तातडीने काढून घ्यावीत, राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे.