जळगाव । येथील ज्येष्ठ कवी तथा लेखक अशोक कोतवाल यांचा ‘स्वप्न विकणारा माणूस’ हा गद्यपाठ येत्या शैक्षणिक वर्षांपासून सातवीच्या ‘बालभारती’ या पाठ्यपुस्तकातून अभ्यासला जाणार आहे. हा गद्यपाठ त्यांच्या ‘सावलीचे घड्याळ’ यापुस्तकातून घेण्यात आला आहे. कोतवाल यांचा ‘झडीचा पाऊस’ हा त्यांचा गद्यपाठ दहावीच्या ‘आंतरभारती’ पाठ्यपुस्तकात समावेश असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एफवायबीएच्या अभ्यासक्रमात त्यांच्या दहा कवितांचा समावेश आहे. पुणे विद्यापीठात टीवायबीएला त्यांचे ‘प्रार्थनेची घंटा’ हे पुस्तक सहा वर्ष अभ्यासला होते.
यापूर्वीही त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश
अशोक कोतवाल यांनी मराठी साहित्यक्षेत्रात नव्वादोत्तरी कालखंडात एक महत्त्वाचे कवी आणि वैशिष्टपूर्ण लेखन करणारे ललित गद्यलेखक म्हणून आपले स्वंतत्र स्थान निर्माण केलेले आहे. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने नुकताच त्यांचा तिसरा काव्यसंग्रह ‘नुसताच गलबला’ प्रकाशित केला आहे. आतापर्यंत कोतवाल यांचे ‘मौनांतील पडझड’ आणि ‘कुणीच कसे बोलत नाही’ हे दोन कविता संग्रह तसेच ‘प्रार्थनेचा घंटा’ व ‘सावलींच घड्याळ’ हे ललित संग्रह तसाच ‘खानदेशचे काव्यविश्व’ हा संपादित ग्रंथ आणि ‘घेऊ या गिरकी’ हा बालकविता संग्रह ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यासोबत लोककथा, लोकगीते व लोकपरंपरांतून उलगडतजाणार्या खान्देशच्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणारे त्यांचे ‘दालगंडोरी’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.