मेलबर्न: ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा सहा वेळा जिंकण्याची किमया सेरेना विल्यम्सने साधली आहे. मात्र यंदा तिचा विजेतेपदाचा मार्ग अधिक बिकट असणार आहे. त्या तुलनेत गतविजेत्या अँजेलिक कर्बरला पुन्हा अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान हे सोपे असणार आहे. सेरेना २३ व्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हंगामातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेना स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिकशी सलामीच्या लढतीत लढणार आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानापर्यंत भरारी घेणारी बेलिंडा ही धक्कादायक विजयासाठी खास ओळखली जाते.
या स्पर्धेसाठी द्वितीय मानांकन लाभलेल्या सेरेनाचे गतवर्षी जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कर्बरने हिसकावून घेतले होते. सेरेनाची चौथ्या फेरीत ब्रिटनच्या जोहाना कोंटाशी गाठ पडणार आहे, तर उपांत्यपूर्व फेरीत स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुल्कोव्हाशी लढत होऊ शकेल. त्यानंतर उपांत्य फेरीत कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान तिच्यापुढे असू शकेल. गेल्या वर्षी प्लिस्कोव्हाकडून पराभूत झाल्यानंतरच सेरेना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर फेकली गेली होती. त्यामुळेच स्टेफी ग्राफचा २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकण्याची सेरेनाची संधी हुकली होती.
जेतेपदासाठी मरेची कसोटी
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेला अँडी मरे आपल्या टेनिस कारकिर्दीत सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास त्याला केई निशिकोरी किंवा स्टान वॉवरिंकाचे आव्हान समोर असेल. २०१६ हे वर्ष मरेसाठी यशस्वी ठरले होते. मागील वर्षी त्याने दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेतेपद काबीज केले, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक पुन्हा स्वत:कडे राखले. याशिवाय वर्षांअखेरीस त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केले. मरेला पाच वेळा ऑस्ट्रेलियन विजेतेपदाने अंतिम फेरीत हुलकावणी दिली आहे. यापैकी चार वेळा गतविजेत्या नोव्हाक जोकोविचकडून तो पराभूत झाला होता.