सातारा रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी

0

कात्रज । सातारा रस्त्यावरील बीआरटी विकसनाचे काम संथगतीने सुरू असून आराखड्यात आवश्यक ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचा अभाव असल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे, ग्रेड सेप्रेटर, कामाची गुणवत्ता व योग्य गतीने काम व्हावे, यांसह राजीव गांधी प्राणी संग्रहालय ते कात्रज डेअरीपर्यंत ग्रेडसेप्रेटर (भुयारी मार्ग) केला तर नागरिकांची सोय होईल. तसेच अपघातांची मालिका थांबण्यास मदत होऊ शकेल, अशी मागणी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी केली आहे. योग्य नियोजनाच्या अभावामुळे या रस्त्याच्या विकासकामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून त्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

महापालिकेच्या वतीने सुमारे 75 कोटीचा निधी खर्च करून कात्रज ते स्वारगेट चौकापर्यंत दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. कात्रज डेअरीपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता जुन्या नकाशामध्ये ठेवण्यात आलेला नाही. तसेच कात्रज डेअरी, भारती विद्यापीठ, सरहद कॉलेज, कात्रज पीएमटी डेपो, धनकवडी क्षेत्रिय कार्यालय, भारती विद्यापीठ हॉस्पिटल, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ही महत्त्वाची ठिकाणे असून नागरिकांची मोठी वर्दळ असते. सर्व्हिस रस्ता नसल्यास या ठिकाणी नागरिकांनी कसे जायचे, असा प्रश्‍न नगरसेवक युवराज बेलदरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संदर्भात भविष्यात उद्भवणार्‍या समस्येकडे आयुक्त कुणाल कुमार यांचे लक्ष वेधले आहे.

या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे, सर्व्हिस रस्ता, ग्रेड सेप्रेटर, कामाची गुणवत्ता व योग्य गतीने काम व्हावे म्हणून आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक वसंत मोरे, नगरसेवक अमृता बाबर यांनी देखील वारंवार भेटी घेऊन प्रशासनाच्या लक्षात या समस्या आणून दिल्या आहेत. तसेच कात्रज डेअरी ते भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हा सर्विस रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्ता दुरुस्तीच्या नकाशात बदल करून 7 मीटरचा हा रस्ता करण्याचे मान्य करण्यात आले. त्याचे काम देखील सुरू करण्यात आले. कात्रज ते स्वारगेट या सातारा रस्त्यावर खासगी व बस वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे कात्रज ते बालाजीनगर उडाणपुलापर्यंत रस्ता नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो. राजीव गांधी प्राणी संग्रहायलात दररोज हजारो पर्यटक येत असतात. रस्ता ओलांडताना अनेकवेळा या चौकात लहान-मोठे अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालय ते कात्रज डेअरीपर्यंत ग्रेडसेप्रेटर (भुयारी मार्ग) केला तर नागरिकांची देखील सोय होईल. अपघातांची मालिका थांबण्यास मदत होऊ शकते, अशी मागणी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी केली आहे.

कात्रज ते स्वारगेट बीआरटी विकसनाचे काम करत असताना या भागातील नागरिकांच्या दृष्टीने भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांचा विचार होणे आवश्यक आहे. सेवा रस्त्यांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान वाटते. विविध समस्यांसाठी आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देऊन या भागाची तातडीने पाहणी करण्याची मागणी करणार आहे.
– युवराज बेलदरे, नगरसेवक