सातासमुद्रपार जाणार्‍या नंदुरबारच्या लालभडक मिरचीचा ठसका झाला कमी

0

नंदुरबार (रविंद्र चव्हाण)। सातासमुद्रपार जाणार्‍या नंदुरबार येथील प्रसिद्ध लालभडक मिरचीचा ठसका यंदा कमी झाला आहे. आंध्रप्रदेशमधील गुंटूर या ठिकाणी मिरचीचे बाजारपेठेवर दिसून येतोय नंदुरबार जिल्ह्यात देखील यावर्षी मिरचीचे दुप्पटीने उत्पादन निघाल्याने मिरचीचा भाव प्रचंड प्रमाणात घसरला. त्यामुळे कुणी मिरची घेता का? असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर येवून ठेपली आहे. राज्यात मिरचीचे आगार म्हणून नंदुरबारच्या बाजारपेठेची ओळख आहे. जरेला, फाफडा शंकेश्‍वरी, जी थ्री या सारख्या जातीच्या मिरचीचे उत्पादन शेतकरी घेतात बाजारपेठेतही मिरचीला चांगलीच मागणी असते.

कवडीमोल भावाने विक्री
आंध्रप्रदेशमधील गुंटूर या ठिकाणी देखील मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने गेल्या एक महिन्यापासून तेथे खरेदी-विक्री व्यवहार बंद झाला आहे. नंदुरबार येथील बाजारपेठेतही तीच परिस्थिती असून शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने काढलेले मिरची उत्पादन वाया गेले आहे. बाजारपेठेत मिरचीला मागणी नसल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाडीत मिरची भरुन गावोगावी कवडीमोल भावाने मिरची विक्री करतांना दिसत आहेत. दरवर्षी शेतकर्‍यांना दिलासा देणार्‍या या लालभडक मिरचीने यंदा मात्र शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. त्यामुळे येणार्‍या हंगामात मिरची उत्पादन घ्याव की नाही हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे. नंदुरबार येथे मिरची उत्पादन जास्त असतांनाही राजकीय इच्छाशक्ती अभावी चिलीपार्क होवू शकले नाही त्यामुळे मिरची उत्पादक शेतकर्‍यांचे भवितव्य अंधारातच असून राज्यात प्रसिद्ध असलेल्या मिरचीचा ठसका हळूहळू कमी होतो की काय? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.

भावात प्रचंड घसरण
लालभडक, स्वादिष्ठ चवदार मिरची असल्यामुळे ही मिरची चांगलीच भाव खाते. तेवढेच नव्हे तर इराक, इराण सारख्या अरब देशांतही येथील मिरचीला मागणी असते सातासमुद्रापार जाणार्‍या मिरचीचा ठसका मात्र यंदा कमी झालाय. गेल्यावर्षी मिरचीला प्रतिक्विंटल 4000 ते 5000 रुपये भाव होता. यावर्षी दुप्पटीने उत्पादन आल्याने भावात प्रचंड घसरण झाली. सध्या स्थितीत मिरचीला 400 ते 700 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे, तरीही कुणी व्यापारी मिरची घ्यायला तयार नाहीत. कारण सर्वच व्यापार्‍यांनी कोल्डस्टोरेजमध्ये मिरची भरुन ठेवली आहे. परंतू मिरचीला मागणीच नसल्याने बाजारपेठ ठप्प झाली आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र जिल्हाभर दिसून येत आहे.