सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी पाच अर्ज

0

शेवटच्या दिवशी तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल नाही

भुसावळ- तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 27 मे रोजी जाहीर झाला आहे मात्र अखेरच्या दिवशी निवडणूक विभागाकडे केवळ पाच नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत तर तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.

ग्रामपंचायत निहाय आरक्षण कंसात असे
तालुक्यातील पिंप्रीसेकम-निभोंरा बुद्रुक (सर्वसाधारण महिला), मोंढाळा-(अनुसूचित जमाती महिला), अंजनसोंडे- (अनुसूचित जमाती महिला), गोजोरा (अनुसूचित जमाती महिला), चोरवड-खेडी- (अनुसूचित जमाती महिला), आचेगाव- (सर्वसाधारण), शिंदी- (नागरीकांचा मागास प्रवर्ग) अशा सात गावामध्ये आरक्षण पद्बतीने रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा 27 मे रोजी कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी 7 ते 12 मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतीम मुदत होती मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पिंप्रीसेकम-निंभोरा, आचेगाव आणि शिंदी अशा गावांमधून प्रत्येकी एक,तर मोंढाळा गावातून दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.तर अंजनसोंडे, गोजोरा आणि चोरवड-खेडी या गावातून एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. यामुळे या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहेत. निवडणूक शाखेकडे दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची सोमवारी छानणी होणार असून बुधवारी माघारीची मुदत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशिकांत इंगळे आणि एम.आर.दुसाने काम पाहत आहेेत.

प्रमाणपत्राअभावी तीन जागा राहणार रीक्त
सात पैकी अंजनसोंडे, गोजोरा आणि चोरवड-खेडी गावांमध्ये होवू घातलेल्या पोटनिवडणुकीत स्थानिक महिलांकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राचा अभाव आहे. यामुळे एकही नामनिर्देशन पत्र आले नसल्याने या गावामधील ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रीक्त राहणार आहेत.

तीन गावांमध्ये पोटनिवडणूक बिनविरोध
पिंप्रीसेकम-निभोंरा बुद्रुक, आचेगाव आणि शिंदी या तीन गावांमधुन प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे.
यामुळे या गावातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे.