आरक्षण आंदोलनासोबतच सरकारपुढे नवे आव्हान
हे देखील वाचा
मुंबई : राज्यात मराठा आंदोलनाला नऊ तारखेनंतर आणखी तिव्र करण्याचा इशारा त्या संघटनानी दिला असताना राज्य सरकार समोर सरकारी कर्मचा-यांनी देखील संपाचे हत्यार उगारून नवा पेच तयार केला आहे. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जात आहेत. या संपाला पाठिंबा देत दिड लाख राजपत्रित अधिकारी देखील संपावर जात आहेत. या संपाला शिक्षक भारती आणि जिल्हा परिषद शिक्षक संघटनानी देखील पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात पोलिस यंत्रणा वगळता सा-याच शासकीय यंत्रणा संपावर जाण्यासारखी स्थिति निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच कालखंडात राज्यात मराठा आंदोलकांनी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, तर धनगर आंदोलक आणि ओबीसी संघटनानी देखील सरकारला इशारा देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारची आणखी एक सत्वपरिक्षा नव्याने घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
