पोलादपूर (शैलेश पालकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील गोवळकोट परिसरामध्ये 30 डिसेंबर 2016 ते 1 जानेवारी 2017 दरम्यान विनापरवाना अनधिकृतरित्या 13.930 टन रक्तचंदनाची वाहतूक करताना वनविभागाने केलेल्या कारवाईत सर्व रक्तचंदन जप्त करण्यात आले. या तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो वनविभागाला गुंगारा देत तब्बल सात महिने फरारी राहिला. मात्र, रविवारी पहाटेच्या सुमारास त्याला कोल्हापूरच्या मुख्यवनसंरक्षक आणि चिपळूण विभागीय वनअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर एस.टी.बसस्थानकातून पकडण्यात आल्याचे आज सोमवारी चिपळूण परिक्षेत्र वनअधिकारी सचिन निलख यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे अधिकतपणे जाहिर करण्यात आले. या संपूर्ण कारवाईबाबत तसेच या प्रकरणाची माहिती देण्याबाबत पोलादपूर वनविभाग पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
यावर्षी जानेवारी महिन्यात चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात चार ठिकाणी धाडी टाकून रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 9.796 घनमीटरच्या तब्बल 412 रक्तचंदनाच्या ओंडक्यांचा समावेश आहे. 14 टन वजन असलेल्या या चंदनाची किंमत बाजारभावाप्रमाणे 1 कोटी 71 लाख 76 हजार असली तरी परदेशातील चलनानुसार त्याची किंमत कित्येक पट अधिक असल्याचे सांगितले जाते. राज्यात आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या साठयांमध्ये चिपळूण तालुक्यातील कारवाई ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
महाराष्ट्रात मिळत नसलेल्या रक्तचंदनाची तस्करी तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमधून तस्करी होते. या रक्तचंदनाला चीनसह अरब राष्ट्रात मोठी मागणी आहे. दक्षिण भारतातून रक्तचंदन आणून ते पुढे समुद्रमार्गे परदेशात पाठवले जाते. जेएनपीटी बंदरात कंटेनरमधून वाहतूक करताना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. त्याचबरोबर कोल्हापूर, नागपूर, सातारासह ठाणे, अलिबागबरोबरच राज्यात अन्यत्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून जप्त करण्यात आलेला रक्तचंदनाचा साठा तसाच पडून आहे.
चिपळुणातील रक्तचंदन प्रकरणी जप्त करण्यात आलेल साठा हा आता अन्यत्र हलवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या इसा जमालुद्दीन हळदे याचा अटकपूर्व जामीन अर्ज खेड न्यायालयाने 9 फेब्रुवारी 2017 रोजी तर उच्च न्यायालयाने 1 मार्च 2017 रोजी फेटाळल्यानंतर तो फरार झाला आहे. मात्र, हळदे न सापडल्याने तस्करी प्रकरणी पुढील तपासाला वन विभागाला वेग आलेला नव्हता. त्यामुळे याप्रकरणी वनविभागाने आता केंद्राच्या डीआरआय (डायरेक्टरेट ऑॅफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स)ची मदत घेतली जात होती.
घटनेनंतर काही दिवस चिपळूण शहरातच वावरणारया इसा हळदेला ताब्यात घेण्याऐवजी वनविभाग साठे जप्त करण्याच्या मागे धावला. त्यामुळे या संधीचा फायदा उठवत तो फरारी झाला. चिपळूण येथील रक्तचंदन तस्करी उघड होऊन आठ महिने उलटले तरीही याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या इसा जमालुद्दीन हळदे याला पकडण्यात वनविभागाला यश आले नसल्याने वनविभागाच्या कारभाराबाबत साशंकता व्यक्त होत राहिली. अशातच, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झालेल्या तारांकीत प्रश्नानंतर संपूर्ण राज्यातील जप्त रक्मतचंदन साठयाची माहिती वनमंत्रालयाने गोळा करण्यास सुरूवात केली होती. अलिबाग, कोल्हापूर, सातारा, चिपळूणसह अन्यत्र रक्तचंदनाचा सुमारे 1 हजार टनाहून अधिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. या रक्तचंदनाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर लिलावासाठी केंद्राची परवानगी मिळाल्यास राज्याच्या तिजोरीत शेकडो कोटींची भर पडेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने अर्थमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या.
चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात 13.930 टन रक्तचंदन जप्त करण्यात आल्यानंतर त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 21 कोटी रूपयांपर्यंत असल्याची अधिकृत माहिती वनविभागाच्या या प्रसिध्दीपत्रकामध्ये देण्यात आली आहे. रविवारी वनविभागाला आवश्यक असलेला फरार आरोपी इसा जमालुद्दीन हळदे ह्ा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील एस.टी.बसस्थानक परिसरामध्ये येणार असल्याची खबर मिळाल्यानुसार कोल्हापूरच्या मुख्यवनसंरक्षक आणि चिपळूण विभागीय वनअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण परिक्षेत्र वनअधिकारी सचिन निलख हे सावर्डेतील वनपाल सदानंद घाडगे, गुढे येथील वनरक्षक उमेश आखाडे, रामपूरचे वनरक्षक रामदास खोत, आबलोलीचे वनरक्षक आर.पी.बंबर्गेकर यांच्यासह पंचमंडळी सोबत घेऊन पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये शनिवारी रात्रीपासूनच दबा धरून बसले. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एस.टी.स्थानकाच्या शेडमध्ये फरारी आरोपी इसा जमालुद्दीन हळदे आला असता त्यास ताब्यात घेऊन चिपळूण येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले. यावेळी अधिक तपासासाठी इसा हळदे याला कोर्टाने 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यामुळे आता 21 कोटी रूपये किंमतीच्या रक्तचंदनाच्या एकूण तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्याची संधी वनविभागाला चालून आली आहे.
या कारवाईसंदर्भात अधिकृत माहिती देण्याबाबत पोलादपूर वनविभाग पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.पोलादपूर वनविभागाचे अधिकारी याबाबत सदरचे प्रकरण आमच्या खात्याचे असले तरी आमच्या अख्त्यारीत नसल्याची माहिती देऊन कानावर हात ठेऊन मोकळे झाले.