सात महिन्याच्या बालिकेस रेल्वेत एकटे सोडून आईचे पलायन

0

नंदुरबार । येथील रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या पँसेंजर गाडीत आपल्या 7 महिन्याच्या चिमुकलीस सोडून दुसर्‍या गाडीने आईने पलायन केल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीस बाल कल्याण समितीतर्फे औरंगाबाद येथील शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकावर गुरुवार दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान फलाट क्र 3 वर सुरत भुसावळ पॅसेंजरच्या डबा क्र 4 मध्ये एक 7 महिन्यांची बालिका रेल्वे प्रवाश्यांना जोरजोरात रडत असल्याची दिसली. त्या बालिकेजवळ कोणीही नसल्याचे दिसले. यावर त्यांनी गार्ड संदीप तायडे यांना याची माहिती दिली. स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलीसांना चौकशी करण्यास सांगितले असता त्याठिकाणीं बालिकेची आई अथवा कोणतेही पालक आढळून आले नाही. याबाबत चौकशी करतांना इतर प्रवाश्यांना विचारणा केली असता या बलिकेची आई ही बालिकेस येथेच टाकून सुरतकडे जाणार्‍या रेल्वेत निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यांनी केली मदत
चिमुकलीस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर डॉ. दिनेश सूर्यवंशी, नीलिमा वळवी यांनी उपचार केले. बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची माहिती करून घेऊन सदर बालिकेचे नामकरण परी असे करून तिला औरंगाबाद येथील साकार शिशुगृहात दाखल केले. याप्रसंगी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. ईश्‍वर धामणे, सदस्य प्रा. अविनाश माळी, अ‍ॅड. संजय पुराणिक, शोभा आफ्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनीता फुलपगारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते, डॉ. दिनेश सूर्यवंशी, नीलिमा वळवी साकार शिशुगृहच्या ममता मोरे,रेल्वे पोलीस ठाण्याच्या सह्ययक पोलीस निरीक्षक अनिता चौधरी, जिल्हा रुग्णालयातच्या स्वाती कोकुळे, सरिता वसावे आदी उपस्थीत होते.