नंदुरबार। नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2क मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असला तरी राजकीय गोटात मात्र अद्याप शांतताच आहे. नंदुरबार पालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असल्यामुळे केवळ सात महिन्यासाठी नगरसेवक बनण्यात कुणालाही रस राहिलेला दिसत नाही. असे असले तरी निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
शहरातील प्रभाग क्र. 2क मधील उमेदवार अनिता चौधरी यांनी राजीनामा दिला होता. अमळनेर नगरपालिका निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी केली होती. तेव्हापासून प्रभाग क्र. 2 मधील ही जागा रिक्तच होती. या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार दि. 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारला जाईल. 6 मे रोजी आलेल्या अर्जांवर छाननी होवून अंतीम यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. 24 मे रोजी मतदान घेण्यात येवून दि. 26 मे ला अंतीम निकाल जाहीर केला जाणार आहे. कालपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली असली तरी एकही अर्ज विक्री झाला नाही नाही. पालिकेची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे या सात महिन्यासाठी नगरसेवक बनण्यास फारशी कुणाला उत्स्ाुकता नाही. तरीही निवडणूक रिंगणातील चित्र खर्या अर्थाने 10 मे नंतरच स्पष्ट होणार आहे.