सात लाखांचा मुद्देमाल विकला : भुसावळात कुरीयर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : इलास्टीक रन कुरीयर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने ग्राहकांचे पार्सल त्यांच्या पत्त्यावर न पोहोचवता परस्पर त्याची विल्हेवाट लावत तब्बल सात लाख 30 हजारांचा अपहार केल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश राजेंद्र भावसार (रा.प्रल्हाद नगर, भुसावळ) असे डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. इलास्टीक रन कंपनीतर्फे भुसावळात नीलेश भावसार याची डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्ती होती. ऑनलाइन ऑर्डर नोंदवून ग्राहकांचे पार्सल त्यांच्या पत्त्यावर पोहोचवण्याचे काम संशयित भावसार करत होता मात्र त्याने 12 मोबाईल, एक टीव्ही, कॅमेरा आणि म्युझिक सिस्टम असा मुद्देमाल संबंधीत ग्राहकांना न देता परस्पर मालाची विल्हेवाट लावली. संशयिता ने एकूण सात लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा कंपनीचे श्रीकृष्ण संजय साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी तपास करत आहेत.

तर चोरीचा माल घेणारे होणार आरोपी
आरोपी निलेशच्या अटकेनंतर मुद्देमाल कुठे ठेवला वा कुणाला विकला याचा उलडा होणार आहे. संबंधितांकडून मोबाईल, टीव्ही, कॅमेरा विकला असेल तर त्यांच्याकडून तो जप्त केला जाईल न दिल्यास माल विकत घेणार्‍यांही या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे.