धुळे । दरवर्षी शहरात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार उद्भवतात. लागण झाल्यानंतर मनपाचा आरोग्य विभाग खडबडून जागा होतो आणि उपाय योजना केल्याचे चित्र निर्माण केले जाते. त्यामुळे यंदा साथीचे आजार नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वीच उपाय योजावेत, अशी मागणी नगरसेवक संजय गुजराथी यांनी केली आहे. यासंदर्भात उपायुक्त रविंद्र जाधव यांना त्यांनी सविस्तर निवेदन दिले आहे.
असा आहे निवेदनातील आशय
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी मनपाने आत्ताच फवारणी, धुरळणी, अॅबेटींग, गटार काढणे, गाळ उचलणे, साफसफाई करणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग यात हलगर्जीपणा करीत असून बर्याचदा रस्ता झाडून कचरा बाजूलाच लावला जातो. गटारीतील घाण काढल्यानंतर ती वेळीच उचलली जात नाही. ही सर्व चालढकल स्वच्छता निरिक्षक, मुकादम व कर्मचार्यांच्या संगनमताने होत असून आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराला वेळीच आवर घालणे गरजेचे झाले आहे. मनपातील अधिकार्यांनी नूकतीच पहाणी करून 85 लेटलतिफ कर्मचार्यांवर कारवाई केली. मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांवर कुणाचाही वचक नसल्याने ते मनमानी कारभार करतात. मनपाने वेळीच ते थांबवावे अन्यथा नागरिकांना घेवून आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
यांची आहेत नावे
निवेदनावर संजय गुजराथींसह शिवसेनेचे अतुल सोनवणे, हिलाल माळी, भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, प्रा.शरद पाटील, सतिष महाले, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, नरेंद्र परदेशी, गंगाधर माळी, प्रशांत श्रीखंडे, वैशाली लहामगे, ज्योत्स्ना पाटील, हेमा हेमाडे, मुक्ताबाई घुगरे, हिराताई ठाकरे आदींची नावे आहेत.