जिल्हाधिकार्यांची उपायांसाठी बैठक
जळगाव | शहरात डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यु यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत असल्याने या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून शहरात धूराळणी करण्यासाठी तातडीने आठ धूराळणी यंत्र खरेदी करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. शहरात साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेदिवस होणारी वाढ लक्षात घेता आज जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकार्यांची तातडीची बैठक उत्साहात
पार पडली.
बैठकीस यांची होती उपस्थिती
या बैठकीस आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती वर्षाताई खडके, महापालिका उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. बनसोडे, कार्यकारी अभियंता श्री. तडवी, डॉ. राधेशाम चौधरी, डॉ. कोठे यांचेसह महापालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यु यासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेमार्फत नागरीकांनी घ्यावयाची काळजीबाबतचे संदेश पोहोचविण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये रिक्षाद्वारे प्रचार करण्यात येणार आहे. नागरीकांनी तब्बेतीची काळजी घेतानाच शरीरात ताप असल्यास त्वरीत डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सध्या नवरात्र सुरु असल्याने नवरात्रीच्या उत्सावामध्ये सामील होताना काळजी घ्यावी. साथीच्या आजारांचा फैलाव गर्दीच्या ठिकाणी लवकर होत असल्याने शाळा, बस स्टॅन्ड, रेल्वे स्थानक याठिकाणी तातडीने फवारणी करण्याच्या सुचना आमदार सुरेश भोळे यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या. त्याचबरोबर शहरात शौचालयांची संख्या वाढवावी, जेणेकरुन नागरीक उघडयावर शौचास बसणार नाही.