साथीचे रोग रोखण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे: आरोग्यमंत्री

0

मुंबई : राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे, अशा स्थितीत साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वाइन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करावीत, औषध आणि धूर फवारणी करावी, प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून नागरिकांना सजग राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

राज्याच्या काही भागात गेल्या दोन ते तीन तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अशा वेळी साथीचे रोग नियंत्रणात रहावे यासाठी आरोग्यमंत्र्यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाल्यावर निर्जंतुक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक होऊ शकतो अशावेळी आरोग्य यंत्रणेला घ्यावयाच्या प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करतानाच त्या भागात वैद्यकीय पथक 24 तास उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. औषधोपचाराबरोबरच ग्रामस्थांना निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या, आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.