साथीच्या आजारांचा धोका

0

पुणे । शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दमट हवामान, साचलेले पाणी, पाण्यात सडलेला कचरा यामुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसि, जुलाब आदी साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

परतीच्या पावसाने रविवारपासून शहरात चांगली हजेरी लावली होती. बुधवारपर्यंत दमदार पाऊस पडला. गुरुवारी पावसाने थोडी उघडीप दिली. मात्र, पाऊस पडून गेल्यानंतर साचलेले पाणी, वाहून आलेला तसेच सडलेला कचरा यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच, हवामानही दमट आहे. हे वातावरण विषाणुंसाठी पोषक असते. त्यामुळे विषाणुंचा प्रादुर्भाव वाढल्याने विषाणुजन्य ताप, थंडी, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. यासाठी विशेषतः लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

पाऊस थांबल्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरी सखल भागात वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे अतिसार, पोटाचे विकार, कावीळ, लेप्टोस्पायरोसिस असे पाण्याद्वारे पसरणारे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाचे पाणीही साचल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांचा फैलाव होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.