राजगुरुनगर : खेड तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, चिकून गुणिया व तापाच्या साथीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन समाजाचे प्रबोधन करण्यासाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राजगुरु नगरपरिषद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर यांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात डेंग्यू, मलेरिया विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात दोनशे स्वयंसेवक सहभागी झाले.
रॅलीचा शुभारंभ खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जी.जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, नगरसेवक मनोहर सांडभोर, सचिन मधवे, प्रा. दिलीप मुळुक, गणेश देव्हरकर, एस.एस.सुलाखे, संपत गारगोटे उपस्थित होते.
बसस्थानक, बाजारपेठ, नगरपरिषद मार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी घोषणा, पथनाट्याद्वारे जनजागृती केली. डॉ. पवार यांनी साथीच्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ‘स्वच्छता ठेवी दारी डेंग्यू मलेरिया पळ काढी, क्लोरिक्वीनची गोळी करी हिवतापाची राखरांगोळी, येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची, कोरडा दिवस पाळा रोगराई टाळा’ अशा घोषणा एनएनएसच्या स्वयंसेवकांनी दिल्या. या रॅलीचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळुक, प्रा. योगेश वाळुंज, प्रा.रुपाली वायाळ यांनी केले.