जळगाव । मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी विभागाच्या माध्यमातून विविध रुग्णालयातील रुग्णांकरिता उपचारात्मक योग घेण्यात आला. यात सेवाभाव ही वृत्ती ठेवून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, शिवम हॉस्पिटल, इंडो – अमेरिकन या तीन रुग्णालयातील रुग्णांकरिता हा योग घेण्यात आला. योग हे एक चिकित्साशास्त्र सुद्धा आहे. अनेक विकारांनी युक्त रुग्णांना औषधीचे गुण अधिक लागावे याकरिता ओमकार साधना, सहज श्वसन आणि ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
योगातील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य
यावेळी रुग्णालयातील वातावरणात सात्विक लहरींचे प्रक्षेपण होण्यास मदत झाली. यामुळे रुग्णांना बरे होण्यास मदत होईल असा विश्वास विभाग प्रमुख आरती गोरे यांनी व्यक्त केला. या उपक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. किरण पाटील, सेवालयाचे निंबा सैंदाणे, योग विभागातील प्रा.देवानंद सोनार, प्रा. पंकज खासबागे, डॉ.लीना चौधरी, प्रा.ज्योती वाघ, डॉ.अनंत महाजन यांच्यासह योगातील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.