साध्वी प्रज्ञांची उमेदवारी रद्द होणार नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0

भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळमधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवीत आहे. त्यांच्यावर बॉम्बस्फोटप्रकरणी ते आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती. दरम्यान त्यांच्या उमेदवारीवर बंदी आणण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर विरोधात काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्याविरुद्ध दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.

महाराष्ट्र एटीएसने २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ‘मुख्य षडयंत्रकर्ती’ असल्याचे सांगत गुन्हा दाखल केला होता. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रज्ञा ठाकूर हिला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी पूनावाला यांनी निवडणूक आयोगासमोर केली होती. परंतु, कायदेशीररित्या साध्वी प्रज्ञा हिला निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यासाठी निवडणूक आयोगानं असमर्थता दर्शवली आहे.